गडचिरोली जिल्हयातील गरजू लोकांसाठी तातडीने विकास कामे करा : खासदार अशोक नेते

88

– दिशा समितीच्या बैठकीत विभाग प्रमुखांना सूचना
– लसीकरण मोहीम, जल जीवन मिशन बाबत उत्कृष्ट कामासाठी अभिनंदनाचा ठराव
The गडविश्व
गडचिरोली : नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित गडचिरोली जिल्हयात विकास कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष अशोक नेते यांनी दिल्या. जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सांगड घालून ग्रामीण भागात रस्ते, घरकूल, शैक्षणिक सुविधा वेळेत पुर्ण होणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाने कामे करताना गुणवत्तापूर्वक होतील याकडेही लक्ष घालावे. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा सचिव दिशा समिती संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वद, धानोरा नगर पंचायत नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम, समितीचे सदस्य बाबूरावजी कोहळे, प्रकाश गेडाम, डी.के.मेश्राम, लताताई पुनघाटे तसेच प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री सडक योजना, स्वच्छ भारत मिशन, घरकूल, रेल्वे, शालेय शिक्षण, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य, राष्ट्रीय महामार्ग आदी विषयांवर आढावा घेण्यात आला.
सर्वसामान्य लोकांसाठी बँकेमार्फत आरोग्य वीमा काढण्यात येतो. मात्र बऱ्याच अशिक्षित लोकांना माहिती नसल्याने ते लाभापासून वंचित राहतात. त्यासाठी सर्व बँकांना बँक मित्र खिडकी सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हयातील डिमांड भरलेल्या ग्राहकांना वीज जोडणी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तेंदूपत्ता काढल्यानंतर जंगले पुरवठादारांकडून पेटवली जात असल्याच्या तक्रारी येतात याबाबत खासदार अशोक नेते यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना वन विभागाला केल्या.

लसीकरण मोहीम, जल जीवन मिशन बाबत उत्कृष्ट कामासाठी अभिनंदनाचा ठराव

गडचिरोली जिल्हयातील विविध आव्हानांना सामोरे जात आरोग्य विभागाने कोविड लसीकरण मोहिम यशस्वी केली. यामध्ये 86 टक्के नागरिकांना लस देण्यात आली. गडचिरोली जिल्हा 90 टक्के पर्यंत लवकरच पोहचत आहे. याबाबत समिती सदस्य प्रकाश गेडाम यांनी आरोग्य विभागाचा अभिनंदनाचा ठराव सादर केला त्याला सर्वानूमते मंजूरी देण्यात आली. तसेच गडचिरोली जिल्हात जल जीवन मिशन प्रकल्पांतर्ग राज्यात सर्वात चांगले काम झाल्याने त्याही विभागाचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here