– वनविभागात खळबळ आरोपींचा शोध घेणे सुरू
The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑक्टोबर : जिल्ह्यातील सिरोंचा वनपरिक्षेत्रातील आरडा नियतक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पेंटिपाका- पाटीपोचम्मा जंगल परिसरात अस्वलाची शिकार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान शिकऱ्यांनी अस्वलाचे चारही पंजे कापून नेले असून मृत अस्वल विद्युत तारेखाली आढळून आल्याने विजेचा करंट लावून शिकार केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
सिरोंचा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आरडा नियतक्षेत्र कक्ष क्र. २९ पीएफ संरक्षित वनामध्ये रस्त्यालगत अस्वल मृतावस्थेत नागरिकांना आढळून आली. याबाबत तात्काळ माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता अस्वलाच्या चारही पायाचे पंजे तसेच लिंग कापून नेल्याचे आढळून आले. मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पशुवैद्यकीय अधिकारी सिरोंचा येथे पाठविण्यात आले. मृत अस्वल नार जातीचा असून अंदाजे १० वर्षाचे असावे असा तर्क लावण्यात आला. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिरोंचाचे उपवनरक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.