– नागरिकांना सावध राहण्याचे केले आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील काही शहरी परीसरात उत्तरप्रदेशातून आलेले काही लोक काळया रंगाचा घोडा सोबत घेऊन फिरत आहेत. काळ्या रंगाच्या घोड्यांच्या टापाला मारलेले नाला घरात बाळगल्यास कोणत्याही शनीची वक्रदृष्टी किंवा साडेसाती लागत नाह असे सांगून नागरिकांची फसवणूक करीत होते. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांचा सुगावा लागताच त्यांचा घोध घेऊन भांडाफोड केला आहे .
घोड्याची नाल घरात ठेवल्यास महादशा आपोआप मिटतात. राहु -केतु चे अरिष्ट दूर होतात असे सांगून घोड्याच्या नाल व्यतीरिक्त शनीच्या अंगठी, ताबिजमध्ये घोड्याचे केस व नखे टाकून मंत्राने भारून परिसरात विकत होते. महा अंनिस च्या कार्यकर्त्यांना त्यांचा सुगावा लागताच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारपूस केले असता त्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्र माहीत नव्हते. लोकांना काही तरी फायदा होत असेल म्हणून लोक स्वत:च खरेदी करतात असे त्यांचे म्हणणे होते.
जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती देऊन त्या अनुषंगाने होणाऱ्या शिक्षेविषयी माहिती दिली असता त्यांनी याविषयी आम्हाला काही माहिती नाही. परंतु या पुढे आम्ही हे धंदे करणार नाही. कृपया आमची पोलीस स्टेशनला तक्रार करू नका म्हणून गयावया करू लागले. महा अंनिस च्या कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तर प्रदेशात जाण्यासाठी काही पैशाची गरज लागेल का अशी विचारणा केली असता , आम्हाला मदतीची गरज नाही पण पोलिस ठाण्यात तक्रार करू नका. आम्ही यापुढे असले उद्योग करणार नाही. आम्ही आमच्या राज्यात निघून जाऊ असे सांगून पून्हा लोकांची फसवणूक करणार नाही म्हणून लेखी स्वरूपात लिहून दिले. यावरून असे लक्षात येते की, या अंंधश्रद्धेला खतपाणी घालून विना सायास पैसे कमविण्यासाठी काही लोक जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त जबाबदार याला बळी पडणारे आहेत. अनेक संत महापुरुषांनी अंंधश्रद्धा निर्मूलनासाठी वसतीपाड्यात जावून जनजागृतीचे कार्यक्रम राबविले व आजही विविध संघटना ते काम करीत आहेत पण समाजातील अज्ञान आणि स्वार्थ या दोन्ही गोष्टीला जोपर्यंत आळा घातला जात नाही तोपर्यंत समाजातील काही लोक लुटण्याचे काम करतील आणि काही लोक सतत लुटल्या जातील. वास्तविक पाहता भूत भानामती करणी जादूटोणा मंत्रतंत्र हे सारे थोतांड आहेत मंत्रातंत्राने जर कोणी काही बिघडवून आणणार असतील तर महा अंनिस तर्फे अशा लोकांना किमान अकरा लाखाचे बक्षीस देण्याचे आवाहन कित्येक वर्षांपासून केलेले आहे परंतु आतापर्यंत ते आवाहन स्विकारण्यासाठी कोणीही पुढे आला नाही . केवळ भितीपोटी लोक अंंधश्रद्धेला बळी पडतात असे महा अंनिस च्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच अश्यापासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन सुद्धा महा अंनिस गडचिरोली च्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले. लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर मंडळी गडचिरोली जिल्ह्यात कोणालाही असे कृत्य करतांना आढळून आल्यास त्वरित पो. स्टे. किंवा महा अंनिस कडे संपर्क साधावा असे आवाहन महा अंनिस चे बुवाबाजी संघर्ष प्रमुख प्रशांत नैताम , जेष्ठ कार्यकर्ते विलास निंबोरकर, व महा अंनिस चे सदस्य तथा प्राणी मित्र अजय कुकडकर यांनी केले आहे.