– आपल्या खोलीत ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली
The गडविश्व
हिंगोली, २२ जुलै : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आश्रमशाळेच्या वसतीगृहात आपल्या खोलीतच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शिवानी सदाशिव वावधने (१६) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विद्यार्थिनी ही कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दहाव्या वर्गात होती. इयत्ता पाचवीपासूनच ते याच शाळेत शिकत असल्याची माहिती आहे.१५ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती आश्रमशाळेच्या वसतीगृहात राहत होती. वसतीगृहाच्या वार्डन गुरुवार २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वसतीगृह नियमित तपासणी करीत असतांना एक मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. वार्डनने सदर घटना लागलीच मुख्याध्यापक यांना सांगितली असता त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या कुटुंबियांना माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता दाखल करण्यात आले. सदर घटनेमुळे एकचं खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.