खळबळजनक : गडचिरोली शहरातील घरगुती नळाच्या पाण्यात आढळले मासाचे तुकडे

3227

– गडचिरोली नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर
– शुक्रवारी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये शुक्रवारी कुजलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेने नागरिकांनी नगरपालिकेप्रती प्रचंड रोष व्यक्त केला होता. अशातच सोमवार, १३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घरगुती नळाच्या पाण्यात मासांचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील चामोर्शी मार्गावरील सेलीब्रशन हॉल नजीकच्या पाणी सोडण्याच्या वॉलमध्ये शुक्रवारी कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळला होता. सदर मृतक युवक दोन दिवसांपासून बेपत्ता होता व त्यानंतर त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटना उघडकीस येण्यापूर्वी संबंधित वार्डातील नागरिकांनी पाण्याचा वापर केला होता अशी माहिती आहे. या घटनेनंतर नगर परिषदेकडून जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली. मात्र, सोमवार १३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास सोडण्यात आलेल्या पाण्याच्या माध्यमातून गोकुळनगर परिसरातील काही नळांमध्ये मासांचे तुकडे आल्याचे धक्कादायक बाब समोर आली.
याबाबतची माहिती मिळताच, The गडविश्व च्या प्रतिनिधीने गोकुलनगर परिसरातील काही घरी भेट दिली असता, मासांचे तुकडे आढळून आले. नेमके नळाच्या पाण्यातूनच मासांचे तुकडे आले का ? याबाबत शहानिशा केली असता, पाणी गाळण्याच्या कापडामध्ये मासांचे तुकडे अडकल्याचे दिसून आले. तर एका घरी नळाला लावलेल्या प्लास्टीकच्या जाळीमध्ये काही मासांचे अवशेष आढळून आले. काही अवशेष जाळी काढल्याने नालीत सुद्धा वाहुन गेल्याचे संबंधित नागरिकांनी सांगितले. सदर घटना किळस येण्यासारखी असल्याने पुन्हा एकदा नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर नागरिकांतुन रोष व्यक्त केेला जात आहे. या गंभीर प्रकारामुळे नगर परिषद नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नगर परिषदेने पाण्याची टाकी व पाइपलाईनची योग्यप्रकारे स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला घटनेबाबत माहिती दिली असता जलकुंभाची स्वच्छता केली असून त्याचबरोबर पाणी पुरवठा करण्यात येणारी पाईप लाईन सुद्धा स्वच्छ केल्याचे सांगितले. तसेच आज शहरात मुनारी देऊन नागरिकांना आवश्यक त्या सुचना देण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा धक्कादायक : गडचिरोलीत नळाच्या पाईपलाईनमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here