क्रांतीवीर बाबुरावांचे ‘स्मृतीस्थळ’ अन्यायाविरुध्द लढ्याची प्रेरणा देणारे स्थान : हंसराज अहीर

108

– शहीदवीर बाबुराव शेडमाके यांना पुण्यस्मृतीदिनी अभिवादन
The गडविश्व
चंद्रपूर, २१ ऑक्टोबर : महान क्रांतीयोध्दा, शहीदवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचे स्वातंत्र्यलढ्यातील शौर्य अव्दितीय होते. त्यांच्या या शौर्यगाथेतून प्रेरणा घेत असंख्यांनी स्वतःला या समरात झोकुन देत मातृभुमीच्या रक्षणार्थ प्राणांची आहूती दिली. देशभरातील अनेक आदिवासी योध्यांनी ब्रिटीशांच्या दमनकारी प्रवृत्तीविरुध्द एल्गार पुकारत बलिदान दिले अशा नरवीरांच्या पंक्तीत वीर बाबुरावजींचे नाव सुवर्णाक्षरात कोरल्या गेले आहे. त्यांच्या शहीदस्थळी वंदन करतांना गत लढ्यांच्या स्मृती जाग्या होवून नवचैतन्य लाभते अन्यायाविरुध्द लढ्याची प्रेरणा देणारे हे स्थान आहे असे विचार पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर महानगरातील जिल्हा कारागृह परिसरात २१ ऑक्टों. रोजी पवित्र शहीद स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करतांना ते बोलत होते. गोंडकालिन वारश्यांने समृध्द चंद्रपूर शहराची ख्याती बाबुरावांच्या हौतात्म्याने अखिल भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचली असल्याचे सांगत अहीर यांनी तमाम आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असलेले हे ठिकाण सर्वांच्या श्रध्देचे तीर्थक्षेत्र व्हावे अशी भावना व्यक्त केली. प्रत्येकांनी या शहीदस्थळी माथा टेकून या क्रांतीवीराच्या असामान्य शौर्यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या पुण्यस्मृती अभिवादन कार्यक्रमास हरिश्चंद्र अहीर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, शहिद बाबुराव शेडमाके समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, उपाध्यक्ष विलास मसराम, श्याम गेडाम, गणेश गेडाम, भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, प्रकाश कुमरे, विठ्ठल कुमरे, राधाबाई सिडाम, सविता मसराम, अॅड. स्नेहल कन्नाके, कमलेश आत्राम, अरविंद मडावी, प्रा. संतोष आडे, डॉ. पंकज कुळसंगे, रविंद्र तुमराम भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, मुग्धा खांडे, बाळू कोलनकर, पराग मलोडे, पुनम तिवारी, गौतम यादव, चंदन अहीर, राहुल सुर्यवंशी यांचेसह आदिवासी बांधव, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात यंदाही अहीर कुटूंबियाव्दारे स्व. कालिदास अहीर स्मृतीप्रित्यर्थ या शहीदस्थळी आलेल्या अनुयायींना अन्न वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here