कोरोनाबाधित बालकांच्या उपचारासाठी सज्जता ठेवा : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

206

द गडविश्व
प्रतिनिधी / नागपूर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विषाणूमुळे बाधित होणाऱ्या काही बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक सज्जता ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या (पीडियाट्रिक टास्‍क फोर्स) बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिकेचे अपर आयुक्त राम जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बालरोग तज्ज्ञ कृती दलाचे सदस्य डॉ. उदय बोधनकर, डॉ. कुश झुनझुनवाला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. सायरा मर्चंट, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम बोकडे, डागा स्त्री रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. विनिता जैन, राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा सिरमनवार यावेळी उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित बालकांच्या उपचारासाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्यात. तसेच पुरेशा प्रमाणात औषधी, इतर आवश्यक सामग्री व मनुष्यबळ सज्ज ठेवणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. तसेच कोविड बाधित बालकांच्या उपचारासाठी आवश्यक औषधींच्या उपलब्धतेसाठी आरोग्य विभागाने समन्वय साधावा, असेही त्यांनी सांगितले.
कोविड बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात दिरंगाई होवू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बाधित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियोजन करावे. महापालिकेने बालकांच्या उपचारासाठी शहरात स्वतंत्र सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याकरिता तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता पाठपुरावा करावा, असे विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जिल्ह्यात कोविड रुग्णालयांमध्ये बालकांवर उपचारासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच कोविड बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध खाटा व इतर आवश्यक बाबींचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असल्याचे सांगितले.
महापालिकेमार्फत कोविड बाधित मुलांच्या उपचारासाठी विद्यापीठ इमारतीमध्ये स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अपर आयुक्त जोशी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here