कोरेगाव येथे पेरणी यंत्राद्वारे भात व इतर पिकांचे लागवड प्रात्यक्षिक

918

– आत्माचा कौश्यल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

The गडविश्व
देसाईगंज : कृषी विभाग व आत्मा च्या पुढाकारातून देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे पेरणी यंत्राद्वारे भात पीक लागवड तसेच भात व इतर खरीप व रब्बी पिकांच्या लागवडी करिता उपयुक्त यंत्रांचे प्रात्यक्षिका सह प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आलेले होते.
पूर्व विदर्भात भात हे प्रमुख पिक म्हणून खरीपात तसेच उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. परंतु भात पिक उत्पादक शेतकऱ्यांपुढे सध्या लागत असलेले बेसुमार लागवड खर्च तसेच भात शेती करीत असतांना चुकीच्या मशागत पद्धतीमुळे बिघडत असलेले जमिनीचे पोत हे मोठे आव्हान आहेत. त्याचबरोबर देश्याच्या आणि राज्याच्या सरासरी भात उत्पादकतेच्या तुलनेत पूर्व विदर्भातली उत्पादकता फार कमी आहेत.
कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, आत्मा, ग्रामीण जीवन्नोती अभियान सारख्या इतर सर्व यंत्रणा ह्या समस्यांवर निरंतर कार्यरत आहेत. प्रत्यक्ष शेतकन्यांच्या बांधावर जाऊन प्रात्याक्षिके व प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती व कृषि विस्ताराचे कार्य करीत आहेत.
कृषि विभाग व आत्मा मार्फत आयोजित सदर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण (भात पीक यांत्रिकीकरण) कार्यक्रमात वडसाचे प्र. उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम यांनी शेतकऱ्यांना प्रास्ताविकपर मार्गदर्शन करते वेळी शेतकऱ्यांना भात शेतीमध्ये संपूर्ण उत्पादन खर्चामध्ये मुख्यतः लागवड खर्च, किड रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन वरील अमर्याद खर्च आणि कमी उत्पादकता येण्याच्या कारणापैकी योग्य वेळेवर होत नसलेली लागवड व काढणी बाबत विस्तृत माहिती दिली. जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्बात वाढ होण्याच्या अनुषंगाने हिरवळीच्या खतांचा वापर करण्याविषयी माहिती विषद केली. तसेच तूर पिकाच्या बाबतीत नागमोडी पद्धतीने बांधावर तूर लागवड आणि दोनदा शेंडे खुडणी केल्यामुळे तूर उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूनी ह्या किमान तंत्रज्ञानाचे वापर करण्याविषयी आवाहन केले.
कृषि विज्ञान केंद्र, सोनापुर, गडचिरोली चे ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषज्ञ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक स्थळी बोडधाचे पेरणी यंत्रधारक महादेवजी कुमरे, तसेच कसारी येथील गोपालजी उईके यांचेकडे उपलब्ध असलेले पेरणी यंत्राद्वारे भात पिकासह इतर पिकांची पेरणी करण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पेरणी यंत्रामध्ये शून्य मशागत पेरणी यंत्र (झिरो टिल) तसेच BBF द्वारे पिक पेरणी सह खत देणे आणि पेरणी यंत्राची निगा व दुरुस्ती बाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
कोरेगाव येथील प्रगतीशील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात यांत्रीकीकरणाद्वारे आमुलाग्र बदल घडविणारे स्थानिक कृषि अवजारे व यंत्रनिर्माते म्हणून ख्याती असलेले दीनेश कूर्डेकर यांनी भात पिक सह इतर मका व रब्बी पिकांच्या लागवड करते वेळी चुकीच्या पद्धतीने यंत्राचा वापर केल्यामुळे शेतजमिनीचे होत असलेल्या नुकसानाबाबत माहिती दिले. तसेच त्यांचे मार्फत निर्मित रोटा यंत्र, मका व रब्बी पिक पेरणी यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
अश्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजनामुळे यंत्रधारक शेतकरी तसेच इतर शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून यंत्र चालविण्याचे कौश्यल्य विकसित झाल्याची प्रतिक्रिया पं.स. वडसा माजी उपसभापती गोपालजी उईके तसेच इतर शेतकरी वर्गामधून व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी पं.स. वडसा माजी सभापती मोहनजी गायकवाड, कोरेगाव ग्रा.पं. सरपंच प्रशांत कीलनाके, कोरेगावचे पोलीस पाटील श्यामजी उईके, प्र. मंडळ कृषी अधिकारी भूषण देशमुख, कृषी पर्यवेक्षक सी. जी. ताडपल्लीवार तसेच तालुका कृषी अधिकारी वडसा कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्विते करिता आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि डि रहांगडाले, चोप चे कृषी सहायक योगेश बोरकर तसेच कोरेगाव येथील कृषिक्रांती शेतकरी गटाचे सदस्यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here