The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ९ ऑक्टोबर : तालुक्यातील कढोली वरुण ८ किमी अंतरावर असलेल्या मोहगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता आहे का मृत्यूचा सापळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे मात्र प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
कढोली ते मोहगाव हा ८ किम चा रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असून या भागातच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवासी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाणे जातीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.