कुठे घेऊन चाललात, महाराष्ट्र माझा ?

286

(महाराष्ट्र राज्य निर्माण दिन विशेष.)

– हो, आपण ते करतही आहोत. परंतु माझ्या महाराष्ट्रात स्त्रियांचा अनादर, बलात्कार, जातीधर्माच्या भिंती, भ्रष्टाचार, खून, चोऱ्या, आदी कलंकित करणाऱ्या गोष्टींना अजूनही पाहिजे तशी खीळ बसलेली नाही, हे मान्य करावेच लागते. महाराष्ट्राचे गौरवगान ऐकले तर माना इंचभर उंच होतात, मात्र या गोष्टी मनात आल्याबरोबर उंच माना आपोआपच खाली लुडकतात. याची आम्हाला खरेच लाज वाटायला हवी. श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी यांचा हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्रीयन मनाचे संवर्धन तथा पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, फातिमामाई शेख, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनास अपार कष्ट घेतले. समर्थ रामदास स्वामींनी तर प्रेरणादायी सूत्र असे मांडले-

“मराठा तितुका मेळवावा,
महाराष्ट्र धर्म वाढवावा।।”

१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे. याच दिवशी १९६० साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक व सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिले-

“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा!!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा!!
अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत.

भारत देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे, यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंत व इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही वर्णय रेखाटले. त्यांनी हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे-

“बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।”

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ, अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रम, त्याग आणि देशप्रेम यांची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील, बिरसा मुंडा यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. सुंदर शब्दांत स्वाभिमान जागवताना वसंत बापटांनीही नकलून ठेवले-

“भव्य हिमालय तुमचा अमुचा,
केवळ माझा सह्यकडा।
गौरीशंकर उभ्या जगाचा,
मनांत पूजिन रायगडा।।”

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. कुणी तरी कवी बेंबीच्या देठापासून ओरडून महाराष्ट्राचा जयकारा बोलतो-

“जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा!!”

आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा. हो, आपण ते करतही आहोत. परंतु माझ्या महाराष्ट्रात स्त्रियांचा अनादर, बलात्कार, जातीधर्माच्या भिंती, भ्रष्टाचार, खून, चोऱ्या, आदी कलंकित करणाऱ्या गोष्टींना अजूनही पाहिजे तशी खीळ बसलेली नाही, हे मान्य करावेच लागते. महाराष्ट्राचे गौरवगान ऐकले तर माना इंचभर उंच होतात, मात्र या गोष्टी मनात आल्याबरोबर उंच माना आपोआपच खाली लुडकतात. याची आम्हाला खरेच लाज वाटायला हवी.

!! महाराष्ट्र राज्य निर्माण दिनाच्या प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

श्री.कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
(भारताच्या वैभवशाली इतिहास-अस्मितेचे गाढे अभ्यासक.)
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here