उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’उर्जा महोत्सवचा गडचिरोलीत शुभारंभ

184

– भौगोलिक समस्येमूळे वीज पोहचू न शकलेल्या गावात वीज नेवू ; जिल्हाधिकारी संजय मीणा

The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर@2047 या उर्जा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ वर्षात उर्जा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा वेध घेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन संपुर्ण भारतात करण्यात आले आहे. त्यात आज गडचिरोली येथे जिल्हयातील कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. जिल्हयाचे खासदार अशोक नेते ऑनलाईन स्वरूपात दिल्ली येथून उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. यावेळी महावितरण प्रादेशिक संचालक नागपूर सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण चंद्रपूर परिमंडळ सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ सुनिल देशपांडे, पॉवर फायनांस कॉर्पोरेयानचे महाव्यवस्थापक अरूण श्रीवास्तव, अधीक्षक अभियंता रविंद्र गाडगे, सुहास म्हेत्रे हरीश गजबिये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महावितरणच्या विविध योजनांचे प्रातिनिधीक लाभार्थी, कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी शालेय मुलींनी स्वागत गीत गावून पाहुण्यांचे स्वागत केले.

जिल्हयात सर्व ठिकाणी वीज पोहचविण्यासाठी महावितरणने प्राधान्य द्यावे : आमदार डॉ. देवराव होळी

तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची आहे. वीज नसेल तर विकास थांबतो. त्यामुळे विकासाची जननी असलेल्या ऊर्जा विकासात ऊर्जा विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. जिल्हयात नऊ ते बारा गावे अजूनही वीज पुरवठ्या पासून वंचित आहेत. दुर्गम डोंगराळ भागात वीज पुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी आहेत पण मला खात्री आहे येत्या एका वर्षात ती समस्या दूर होईल. ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवात’ वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर करण्यात आला आहे ही बाब प्रशंसनीय आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात वीज पुरवठा नव्हता मात्र केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून जवळपास सर्वच गावात वीज पुरवठा करण्यात यश मिळाले आहे. काही गावात अजूनही वीज पुरवठा भौगोलिक परिस्थितीमुळे करू शकलो नसलो तरी येत्या वर्षात तो पूर्ण होईल याबाबत महावितरणने योग्य प्रकारे नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी कार्यक्रमात उपस्थित त्यांना दिल्या.
‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ हा कार्यक्रम आजादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे. ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऊर्जेच्या बाबतीत तुट असलेला भारत देश आता ऊर्जा पुरवठा करणारा झाला आहे. भविष्यात जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या आदिवासी पाड्याचे ऊर्जीकरण करणे ही महावितरणची उल्लेखनीय कामगिरी असणार आहे. जिल्हयात मागील काही वर्षात जे महावितरणने कार्य केले ते अजून गतीन पुढे नेवून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे ते म्हणाले.

भौगोलिक समस्येमूळे वीज पोहचू न शकलेल्या गावात वीज नेवू : जिल्हाधिकारी संजय मीणा

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी वीजेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. संवाद साधण्याचे ऊर्जा हे महत्वाचे साधन असून आपण त्यामुळेच आज कुठेही, कधीही सहज संवाद साधू शकतो. गडचिरोली जिल्ह्यात नऊ गावात आजही वीज नसून यात तुम्हा आम्हा कोणाचीही चुक नसून येथील भौगोलिक स्थितीमुळे ते शक्य होत नाही. या परिस्थितीवरती मात करून लवकरच सर्वांना वीज मिळेल यासाठी काम सुरु आहे. भौगोलिक समस्येमुळे वीज पोहचू न शकलेल्या गावांमधे वेगवेगळ्या पध्दतीने वीज पुरवठा करण्यासाठी आपण संयुक्त मोहिम राबवून काम करूया असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मनुष्याच्या रस्ता, वीज आणि पाणी या प्रमुख गरजा आहेत. यातील वीज हा आज समाजात दैनंदिन जीवन जगत असताना अविभाज्य घटक झाल्याचे ते यावेळी म्हणाले. दुर्गम भागात जे कर्मचारी काम करीत आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो असेही ते यावेळी म्हणाले. काही दिवसापुर्वी जिल्ह्यात खूप पूर आला होता, गडचिरेाली जिल्ह्यातील ३९५ गावांतील लोकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने तेथील वीज पुरवठा सुरळीत केला असे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.

कार्यक्रमात वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच नुक्कड नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लाभार्थ्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार अधीक्षक अभियंता रविद्र गाडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here