– तातडीची बोलावली बैठक
THE गडविश्व
मुंबई : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज ३ जानेवारी रोजी सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासन यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्याचा शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या बैठकीत आढावा घेतील.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.