आजपासून सर्वसामान्य जनतेसाठी सेवा पंधरवाडा

181

– १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांचे अर्ज/तक्रारी निकाली निघणार
The गडविश्व
गडचिरोली,१७ सप्टेंबर : सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी अर्ज, तक्रारींच्या माध्यमातून पोर्टलवरती प्रत्यक्ष संवाद होवून कामे पूर्ण केली जातात. यामधे काही प्रकरणे प्रलंबित असल्याने योजनांची, सेवांची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो. यासाठी प्रशासनाकडून १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान गडचिरोली जिल्हयात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा शासनाच्या सूचनेनूसार राबविण्याचे नियोजन केले आहे. या कालावधीत प्रशासनाकडे १० सप्टेंबर पर्यंत दाखल सर्व अर्ज तसेच तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत निपटारा केला जाणार आहे असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.
सेवा पंधरवाड्यामधे प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषि, आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा तसेच सर्व शासकीय विभागाकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व संबंधित विभागाकडून जनतेमधे प्रचार प्रसार, शिबीरे आयोजित केली जाणार आहेत.

या आहेत १४ सेवा व पोर्टलची नावे

आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विविध विभागांच्या स्वत:च्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, याव्यतिरीक्त १४ महत्त्वाच्या सेवा यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसार सन्मान निधी योजना, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थींना शिधापत्रिकेचे वितरणे करणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र, प्रलंबित घरगुती विद्यूत जोडणीस मंजूरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्यूत जोडणीमधे नवीन मालमत्ताधारकाचे नाव जोडणे, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे(अपील वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी याबाबत गाव, तालुका व जिल्हा प्रशासनाला सुचना केलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपली तक्रार घेवून वारंवार जिल्हा मुख्यालयी येण्याची गरज पडू नये. संबंधित यंत्रणांनी आपल्याकडील प्रलंबित विषय आपल्याच स्तरावर निकाली काढण्याचे आदेशही आहेत. येत्या पंधरवाड्यात नागरिकांना विविध शासकीय पोर्टल, सेवांबाबत सर्व सामान्यांना माहिती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here