अस्वलाची शिकार केल्याप्रकरणी ५ आरोपींना अटक

449

– वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपीना केली अटक

The गडविश्व
नवेगावबांध (गोंदिया) : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधच्या सहवन क्षेत्र बाराभाटी बीट क्षेत्र चान्ना बाकटीअंतर्गत येणाऱ्या इंजोरी येथे गावालगतच्या शेतात अस्वलाची अवैध शिकार करण्यात आली होती. याप्रकरणीवेगवेगळ्या ठिकाणावरून ५ आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुभाष धर्माजी कापगते (३६) रा.तिडका व बहादुरसिंग शेरसिंग बावरी (२४) रा. नागपूर याने नर अस्वलाची शिकार बंदूक चालवून केल्याची कबुली दिली आहे. तर इतर आराेपी संन्यासी देबेन गोलदार (५७) अरुणनगर, विश्वनाथ पांडुरंग गायकवाड (४४) रा. बोळदा, श्रीकांत रमेश लंजे (३४) रा. बोळदे करड यांचा समावेश आहे.
शिकाऱ्यांनी चितळ व रानडुकराचे मांस आहे अशी बतावणी करून अर्जुनी मोरगाव येथे मांसविक्री केल्याचे कळते. आरोपींना अटक झाल्यामुळे अर्जुनी मोरगाव येथील मांस शौकिनांची अटकेच्या भीतीने झोप उडाली आहे. तर तपासादरम्यान अर्जुनी मोरगाव येथील ३ संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले होते.
इंजोरी रहिवासी हेमराज धनीराम शेंडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे १३ मार्च रोजी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गट क्रमांक १७४ मध्ये जाऊन मोका तपासणी केली असता वन्यप्राण्यांची आतडी, कातडी तसेच पंजे घटनास्थळावर आढळले होते. ही शिकार बंदुकीची गोळी झाडून केल्याचे शव विच्छेदन अहवालात निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. त्या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
अस्वल शिकार प्रकरणातील आरोपी सुभाष धर्माजी कापगते व बहादूर सिंग शेरसिंग बावरी हे पूर्वी अटक झालेल्या आरोपींना १९ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली होती. १९ मार्चला सर्व आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर इतर तीन आरोपींना अटीशर्तीवर जामीन मिळाला आहे. अद्यापही ३ ते ४ आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here