The गडविश्व
सावली : येथील बाजार रोडवर काल 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अपघात होऊन 5 वर्षीय बालकाचा करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यथार्थ भास्कर कलसार असे मृतकाचे नाव असून तो मूल तालुक्यातील राजगड येथील रहिवासी होता. मागील काही दिवसापासून यथार्थ हा सावली येथे आपल्या आजोबा कडे राहत असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावली तालुक्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अवैध वाहतूक असल्याने ट्रॅक्टर चालक चोरट्या मार्गाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवित असतात. बाजार रोडवरील किराणा दुकानांमध्ये मृतक हा सामान घेण्यासाठी आला होता. सामान घेऊन परतत असतानाच अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरने बालकास जबर धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारार्थ सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते व पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सावली पोलिसांना मिळताच ट्रॅक्टर चालक राकेश वरदलवार यास कलम 279, 337, 338 भादवि सहकलम 184 मोवा का अंतर्गत अटक केली. पुढील तपास ठाणेदार शिरसाठ यांच्या नेतृत्वात नापोअ दर्शन लाटकर, स. फौ. दादाजी बोल्लीवार, विशाल दुर्योधन करीत आहेत.
सावली शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजार रोड वरून पहाटेपासूनच ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक होत असून सदर मार्ग जड वाहतुकीस प्रतिबंधित असतानासुद्धा या मार्गाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविल्या जात आहेत. मात्र अशा गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सदर अपघात घडून 5 वर्षीय बालकास आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा होत आहे.