– २७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
The गडविश्व
सावली : स्थानिक पोलिसांनी अवैध कोंबडा बाजारावर धाड टाकून २७ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज २७ जानेवारी रोजी केली.
प्राप्त माहितीनुसार, सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द शेतशिवार गोसेखुर्द कॅनलच्या बाजूला अवैध कोंबडा बाजार भरवून त्यावर पैशाचा जुगार लावत असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंबडा बाजारावर धाड टाकली असता चार जण कोंबडा लढाईवर जुगार खेळतांना आढळून आले. यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. भगवान ऋषीजी आबारे रा. व्याहाड खुर्द, सुहास लहानु दंडीकबार रा. सावली, ज्ञानेश्वर उर्फ बुच्ची सुखदेव गेडाम रा. व्याहाड खुर्द, जयेंद्र जयराम शेंडे रा.माखोडा असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनास्थळावरून कोंबडा जुगारातील पाच जखमी कोंबडे, लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी काट्या, मोबाईल फोन व नगदी असा एकुण २७ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर, पो उप.नि चिचघरे, पोहेका कोंडबत्तुनवार, नापोका दुर्गे, पोशि श्रीकांत वाढई, दिपक चव्हाण यांनी केली आहे. सदर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.