अन्… वाघाने केला हल्ला : मेंढपाळ गंभीर जखमी

757

– गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
The गडविश्व
ता.प्र / सावली, २९ सप्टेंबर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असून, हिरापूर, राजोली, नवेगावनंतर किसाननगरच्या जंगलात बुधवार २८ सप्टेंबर रोजी एका मेंढपाळावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत मुलगा सोबत असल्याने मेंढपाळाचे प्राण वाचले हे विशेष. बंडू धोंडू मद्रेवार ( ७०) रा. चांदली बुज. असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे.
मागील तीन दिवसांपासून या परिसरात वाघाची दहशत सुरू असून, हिरापूर – नवेगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाने चार शेळ्या फस्त केल्या होत्या. बुधवारी मेंढपाळ बंडू धोंडू मद्रेवार (७०) आपल्या मुलासोबत मेंढ्या घेवून संरक्षित जंगलातील कक्ष क्रमांक १५५९ मध्ये गेला होता. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने बंडू मुद्रेवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला करताच सोबत असलेल्या मुलाने आरडाओरड करीत वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शेवटी वाघाने पळ काढल्याने व मूलाच्या समयसुचकतेने वडिलाचे प्राण वाचले.
किसाननगरच्या जंगलातील घटनेची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, व्याहाड खुर्दचे वनपाल सूर्यवंशी, वनरक्षक सुषमा मेश्राम यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. गंभीर जखमी असलेल्या मेंढपाळाला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
मेंढपाळ बंडू मद्रेवार यांच्या मानेला व पोटाला वाघाने ओरबडल्याने गंभीर जखमा झाल्या असून, सावली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे.तरी याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परीसरातील लोकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here