The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०६ : “बौद्ध विहार हे केवळ पूजास्थान न राहता ते वैचारिक, सांस्कृतिक व धार्मिक केंद्र बनले पाहिजे. युवकांनी बौद्ध तत्वज्ञान आत्मसात करून समाज परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकावीत,” असे प्रतिपादन प्रा. जावेद कुरेशी यांनी केले. रांगी येथील तथागत बुद्ध मूर्तीच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
प्रा. कुरेशी पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धम्म दीक्षा घेतली, पण त्याआधीच त्यांनी 1949 मध्ये देशाला बौद्ध तत्वज्ञानावर आधारित राज्यघटना दिली. यावरून बाबासाहेबांचा बौद्ध विचारांचा सखोल अभ्यास किती गांभीर्याने होता, हे स्पष्ट होते. तक्षशिला व नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयांमधून त्यांनी हे विचार आत्मसात केले होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून रिपाई नेते गोपाल रायपूरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मा. शशिकांत साळवे, पो.पा. रामचंद्र कांटेंगे, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला भगत, सुनिल सहारे, ॲड. शांताराम उंदिरवाडे, मारोती भैसारे, सुधाकर मेश्राम, लता भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी रांगी येथील बौद्ध बांधवांचे अभिनंदन करताना सांगितले की, “या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कोणत्याही राजकीय मदतीशिवाय, स्थानिक धम्म बांधवांच्या सहकार्याने झाली, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष तामराज मेश्राम यांनी केले. संचालन प्रमोद राऊत तर आभार सचिव जर्नाधन बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमास रांगी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
बौद्ध विचारांची बीजे नव्या पिढीत रोवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दृढ झाल्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.
