The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि.२० : आधुनिक काळ हे तंत्रज्ञानाचे काळ आहे. हे सर्वश्रुत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्वराज्य निर्माण केले, ते तंत्रज्ञान आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचे स्त्रोत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याच्या ५० वर्षात कधीही नियोजना शिवाय जगले नाही. प्रत्येक बाबीचे नियोजन करूनच त्यांनी मॉ जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले. याच विचारावर आधुनिक काळातील युवकांनी चालावे, असे आवाहन नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी केले.
देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथे अखिल भारतीय कुणबी समाजाच्यावतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ. कृष्णा गजबे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच नितीन लाडे, उपसरपंच प्रकाश डोंगरवार, पंचायत समितीच्या माजी सभापती शांता तितिरमारे, संजय कुथे, माजी सरपंच आत्माराम सुर्यवंशी, गोविंदराव नागपूरकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मदनराव बनपूरकर, नुतन सहारे, किशोर केळझरकर, सुनिता मुद्दलवार व मुख्य मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते विक्रांत ठाकरे, बालवक्ता प्रसाद म्हशाखेत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.आ. कृष्णा गजबे म्हणाले, आजच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. त्यांचे विचार डोक्यात साठवूनच नाही तर ते अंगीकारणे आवश्यक आहे. यातूनच खरी पिढी निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विक्रांत ठाकरे व प्रसाद म्हशाखेत्री यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. दरम्यान, भगवा ध्वज फडकावून महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर महामानवांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी नवीन सभागृहाचे लोकार्पणही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कुथे यांनी केले. संचालन लिलेश्वर पर्वते तर आभार विक्रांत कुथे यांनी मानले.
