– गोंडवाना विद्यापीठात योग दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; जिल्हाभरात उत्साहात आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : “योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर मानसिक स्थैर्य, तणावरहित जीवनशैली आणि अंतःप्रेरणा मिळते. सोशल मीडियाचा अतिरेक, धावपळीचे जीवन आणि मानसिक दडपण यावर मात करण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम आहे. मात्र त्याचा खरा लाभ घ्यायचा असेल, तर योग हा आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले.
योग दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे होते. खासदार नामदेव किरसान यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, “योगामुळे सकारात्मक विचारांची वाढ होते. ध्यानधारणेमुळे मन एकाग्र होते आणि आत्मिक शांती लाभते. योग ही फक्त कृती नसून संपूर्ण जीवनशैली आहे.”
कार्यक्रमात प्र-कुलगुरु श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे आदी मान्यवर उपस्थित होते. योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे व मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
जिल्हा परिषद प्रांगणातही स्वतंत्र योग सत्राचे आयोजन करण्यात आले. आरमोरी येथे आमदार रामदास मसराम आणि माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. एटापल्ली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर झाले.
अहेरी, वडसा, कुरखेडा, कोरची, तसेच विविध शाळा, योग संस्था आणि मंडळांमार्फत जिल्ह्यातील अनेक भागांत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सविता साधमवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस. बी. बडकेलवार, घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, नाजुक उईके, कुणाल मानकर, सुनील चंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, क्रीडापटू आणि योगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत योग दिन साजरा केला.
