The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : तालुक्यातील येडसगोंदी हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. २१व्या शतकातही विकासापासून कोसो दूर असलेले हे गाव एखाद्या अडगळीत टाकलेल्या वस्तीसारखे दिसते. धानोरा मुख्यालयापासून अवघे ३५ आणि जिल्हा मुख्यालयापासून केवळ ५६ किलोमीटर अंतरावर असूनही येथील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि आरोग्य सुविधांचा अभाव ग्रामस्थांच्या जीवनाला होरपळत ठेवतो.
गावाला जोडणारे गट्टा व घोडेझरी रस्ते चिखलमय असून, पावसाळ्यात पायी चालणेही कठीण होते. शालेय मुलांना चिखल तुडवत शिक्षणासाठी गट्टा व कारवाफा येथे जावे लागते. आजारी रुग्णांना अद्याप डोलीतून किंवा खांद्यावर वाहून नेण्याची वेळ येते. ग्रामस्थांनी अनेकदा निवेदनं दिली, पण शासन व लोकप्रतिनिधी यांनी केवळ आश्वासनांवरच थांबवले. निवडणुकीच्या तोंडावर दिलेली गोड आश्वासने पावसानंतरच्या रस्त्याप्रमाणे वाहून जात असल्याची ग्रामस्थांची खंत आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सोलर पॅनल लावून पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी त्याचे व्यवस्थापन कोणी करत नसल्याने पाण्याचा अपव्यय वाढतो. विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे अनेक दिवस अंधार कायम राहतो.
‘विकसित भारत’ची स्वप्ने दाखवली जात असताना येडसगोंदी सारखे गाव मूलभूत सुविधांसाठी तडफडते आहे, हे शासनाच्या उदासीनतेचे व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वृद्ध, महिला, शालेय मुले आणि रुग्ण यांच्या यातना लक्षात घेऊन शासन-प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा गावकऱ्यांचा लोकशाहीवरील विश्वास कायमचा ढळेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews














