कुरखेडा महामार्गाचे काम रखडले ; आठ दिवसांत काम सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन

34

कुरखेडा महामार्गाचे काम रखडले ; आठ दिवसांत काम सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन
– न. पं. उपाध्यक्ष बबलू हुसैनी यांचा कंत्राटदारांना पत्रकार परिषदेतून इशारा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : शहरातील महामार्गाचे रखडलेले व निकृष्ट दर्जाचे बांधकाम आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत असून, नगर पंचायत उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती बबलू हुसैनी यांनी कंत्राटदाराला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. निर्धारित मुदतीत काम प्रत्यक्ष सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
नगर पंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हुसैनी यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून शहरवासीयांना धूळ, खड्डे आणि अपूर्ण नाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेले डांबरी थर आणि साचलेले पाणी यामुळे अपघात व आरोग्य समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सदर कामाचे कंत्राट राजश्री कंपनीकडे असून, मजुरांचे वेतन व बांधकाम साहित्य पुरवठ्यात अनियमितता होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कंत्राटदाराने तात्काळ मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून काम सुरू करावे. अन्यथा शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
महामार्गाच्या कामामुळे व्यापारावरही विपरीत परिणाम झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. धुळीमुळे ग्राहक कमी होत असून, दुकाने ओस पडल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी संघटनेनेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here