नगरसेवक पिपरे दाम्पत्याविरोधात महिला आक्रमक : गडचिरोलीत आत्मदहनाची घोषणा

92

नगरसेवक पिपरे दाम्पत्याविरोधात महिला आक्रमक : गडचिरोलीत आत्मदहनाची घोषणा
– पत्रकार परिषदेतून प्रशासनाला थेट इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : अगरबत्ती प्रकल्प उभारून गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांना रोजगार देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत चामोर्शी तालुक्यातील महिलांनी नगरसेवक आशिष अरुण पिपरे व पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवार ०९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेतून महिलांनी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणासह आत्मदहन करण्याचा टोकाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत अगरबत्ती निर्मिती प्रकल्प सुरू करून रोजगार देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुमारे ४० महिलांना बैठकीस बोलावून बँकेकडून कर्ज मंजूर करून देतो, ते कर्ज माफ करून दिले जाईल, अशी खोटी आश्वासने देण्यात आली. बँकेशी संगनमत करून प्रत्येकी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज महिलांच्या नावावर मंजूर करून घेतले गेले, मात्र ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वळविण्यात आल्याचा आरोप आहे.
महिलांच्या नावावर घेतलेल्या कर्जातून अत्यंत हलक्या प्रतीच्या अगरबत्ती मशीन खरेदी करून त्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात आल्या. नवीन जमीन खरेदी करून मोठा शेड उभारून प्रकल्प सुरू करण्यात आला, मात्र काही महिन्यांतच प्रकल्प बंद पडला. त्यानंतर बँकांकडून कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्यावर महिलांनी रोजगार देण्याची किंवा मशीन देण्याची मागणी केली असता ‘कर्ज तुम्हालाच भरावे लागेल’ असे सांगून त्यांना हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून कर्ज माफ करून देतो, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर बँकांनी न्यायालयीन कारवाई करत मोठ्या रकमेच्या नोटिसा पाठवल्याने महिलांवर जप्तीची भीती निर्माण झाली आहे. नागपूर येथील जनता दरबारात मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन दिल्यानंतर चौकशीचे आदेश होऊनही आजपर्यंत ठोस कारवाई न झाल्याने महिलांमध्ये संताप वाढत आहे.
या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कर्जाच्या ओझ्याखाली महिलांना आत्महत्येचा विचार करावा लागत असल्याची वेदना यावेळी व्यक्त करण्यात आली. राजकीय आशीर्वादामुळेच आरोपींवर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप महिलांनी पत्रकार परिषदेत केला.
पीडित महिलांनी पिपरे दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून उत्पन्नाचा ठोस स्रोत नसताना जमा केलेल्या अमाप संपत्तीची SIT मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर राहील, असा ठाम इशाराही महिलांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #Chamorshi
#WomenProtest #HungerStrike #SelfImmolationThreat
#JusticeForWomen #PoliticalScam #FinancialFraud
#PMEGPScam #BankLoanFraud #LocalBodyCorruption #MunicipalCouncillor #WomenInDistress #Accountability #LawAndOrder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here