– तातडीच्या बंदोबस्ताची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील रांगी ते निमगाव जंगल परिसरात रानटी हत्तींच्या अचानक प्रवेशाने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ९ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजता दोन रानटी हत्ती जंगलात घुसल्याचे निदर्शनास आले आहे. तर आज सकाळीही हे हत्ती नागरिकांच्या निदर्शनास आले, त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे गावकरी प्रचंड घाबरले आहेत.
हे हत्ती दोन वर्षांपूर्वी ओडिशा राज्यातून गडचिरोलीत दाखल झाले असून, गोंदिया, भंडारा, चंद्रपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये संचार करून सध्या पुन्हा गडचिरोलीच्या जंगलात सक्रिय झाले आहेत. रांगी व निमगावच्या घनदाट जंगलात हत्तींचा वावर स्पष्टपणे जाणवत असून त्यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि जंगलात जाणारे लोक भयभीत आहेत. व्हिडिओ : https://www.instagram.com/reel/DKtaFN3Ttai/?igsh=MThuZHV1cjdqOXIwaw==
वनविभागाची टीम हत्तींच्या हालचालींवर सतत नजर ठेवून आहे. मात्र याआधी चांभार्डा व गडचिरोली शहरात हत्तींचा प्रवेश झाल्याने निर्माण झालेल्या दहशतीमुळे, आता रांगी व निमगाव गावांवरही अशीच स्थिती येऊ नये यासाठी तातडीने बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
रांगी क्षेत्राचे सहाय्यक एस.आर. रामगुंडावार यांनी नागरिकांना जंगल परिसरात जाण्यापूर्वी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी अफवांपासून दूर राहून अधिकृत सूचनांचे पालन करावे, असा संदेश वनविभागाकडून देण्यात आला आहे. जंगल परिसरात हालचाल करताना खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
