विसांबा परंपरेच्या लोपाला जबाबदार कोण? ग्रामपंचायतींचं बेजबाबदारपणं की गावकऱ्यांची उदासीनता?

81

– गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विसांबा नष्ट… परंपरेच्या मृत्यूला कोण ठरवणार दोषी?
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गावाच्या सीमेवर पार्थिवाला शेवटचा निरोप देण्याची ‘विसांबा’ ही पवित्र परंपरा आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. विसांबा म्हणजे केवळ दगडी चौकट नव्हे, ती गावाच्या संस्कृतीची आणि एकतेची खूण आहे. पण आज अनेक गावांमध्ये विसांबा अस्तित्वातच नाही – आणि दुर्दैव म्हणजे याबाबत ग्रामपंचायतीही मुग गिळून बसल्या आहेत!

ग्रामपंचायतींचं ठोस दुर्लक्ष – ग्रामसभांमध्येच चर्चेचा अभाव!

गावच्या सांस्कृतिक जडणघडणीला चालना देणं, परंपरांचा आदर राखणं हे ग्रामपंचायतींचं प्राथमिक कर्तव्य असताना, विसांबा सारख्या भावनिक विषयावर ग्रामसभा गप्प! “आमच्या गावात विसांबा नाही, आणि यावर कुणी बोलायलाही तयार नाही,” अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

परंपरा मोडीत… पण कुणाला फरक पडतोय का?

गावकऱ्यांमध्येही या परंपरेबाबत जाणिवेचा अभाव दिसून येतो. नवीन पिढीला विसांब्याचं महत्त्व समजावणारे नेते, सांस्कृतिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आता पुढे येतील का? की ही परंपरा निष्काळजीपणाच्या आगीत भस्मसात होईल?

एकत्र येऊन लढा द्या, नाहीतर परंपरेचा अंत अटळ!

ग्रामपंचायत, सांस्कृतिक मंडळं, स्थानिक तरुण, ज्येष्ठ नागरिक – सर्वांनीच आता एकत्र येऊन तात्काळ कृती करावी लागेल. निधी मिळवा, जागा ठरवा, श्रमदान करा – पण विसांब्याचं अस्तित्व वाचवा! हा लढा केवळ दगडी चौकटीसाठी नाही – तो आपल्या गावकुसातील अस्मितेसाठी आहे!
नाहीतर उद्या कुणी विचारेल – “विसांबा म्हणजे काय?” आणि आपल्याकडे उत्तरही नसेल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here