– NSB Waste Management ने केली चौकशीची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : गडचिरोली नगर परिषदेकडून ८ जुलै २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. NSB Waste Management & Services Pvt. Ltd. या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून निविदा प्रक्रियेमध्ये नियमबाह्यता झाल्याचा आरोप केला आहे.
स्टार्टअप असूनही ‘अनुभव’ कारणावरून बाद?
NSB कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी केंद्र सरकारच्या GFR 2017 स्टार्टअप रजिस्ट्रेशन असल्यामुळे आर्थिक उलाढाल व अनुभव सवलतीसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांना अनुभवाच्या अटीवरून बाद करण्यात आले. परंतु, हिंदवी ऑल सप्लायर्स सर्विसेस या संस्थेला फक्त एकाच नगर पंचायतचा अनुभव असूनही आणि आर्थिक अटींची पूर्तता नसतानाही पात्र ठरवले गेले, असा गंभीर आरोप कंपनीने केला आहे.
अनुभव अटीचे व आर्थिक उलाढाल अटींचे सर्रास उल्लंघन?
निविदेच्या अटींनुसार किमान दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. मात्र, हिंदवी संस्थेकडून फक्त नगर पंचायत धानोरा यांचा अनुभव सादर करण्यात आला असून, तोही केवळ कार्यालयीन कामगार पुरवठ्याचा असल्याचे NSB कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा अनुभव घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित नसून अनुभवाच्या अटीचे सर्रास उल्लंघन झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पूर्व बैठकांतील विसंगतीही उघड
निविदा पूर्व बैठकीत काही कंत्राटदारांनी आर्थिक उलाढालीची अट कमी करण्याची मागणी केली होती, परंतु ती कायम ठेवण्यात आली. तरीदेखील काही संस्थांना अटींमध्ये सूट देऊन त्यांना पात्र घोषित करण्यात आले, असा आरोप आहे.
NSB ची चौकशीची मागणी
या सर्व बाबी लक्षात घेता, NSB कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नियम सर्वांना सारखेच लागू असावेत आणि स्टार्टअप कंपन्यांबाबत एकतर सर्व अटी शिथिल कराव्यात किंवा सर्वांसाठी समान निकष ठेवावेत.
“जर हिंदवी कंपनीला आर्थिक अटींमधून सूट दिली गेली, तर आम्हालाही अनुभव अटीतून सूट मिळायला हवी होती. पण तसे झाले नाही. ही प्रक्रिया नियमबाह्य आहे आणि याची चौकशी व्हायलाच हवी.”
— NSB Waste Management
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #nagarparishad #गडचिरोली #निविदा_विवाद #घनकचरा_व्यवस्थापन #NSBWasteManagement #हिंदवीऑलसप्लायर्स #नियमभंग #StartupDiscrimination #MunicipalTenders #TransparencyDemand #जिल्हाधिकारीचौकशी #ContractDispute #MaharashtraNews #नगरपरिषद #सार्वजनिकहित #स्थानीयप्रशासन
