– प्रलंबित रस्ते प्रकल्पांना गती देण्याची मागणी
The गडविश्व
नागपूर, दि. १३ : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीत डॉ. उसेंडी यांनी गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे, माडेमुल पुलियाचे बांधकाम तसेच आष्टी-येणापूर महामार्गावरील दोन्ही बाजूंचे आरसीसी ड्रेन, पॅडिस्ट्रियल गार्डन रेलिंग आणि बीटी पॉवेल शोल्डर बांधकाम तत्काळ हाती घेण्याची मागणी केली. या सर्व कामांची गरज अत्यंत तातडीची असून ती अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.
ना. गडकरी यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान, गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या बांबू फ्लोरिंग टाईल्सचे नमुनेही डॉ. उसेंडी यांनी गडकरी यांना दाखवले. पर्यावरणपूरक आणि स्वदेशी उपक्रमाला त्यांनी प्रशंसनीय दाद दिली.
गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशातील रस्ते विकासाला वेग मिळाला असून गडचिरोली जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास डॉ. उसेंडी यांनी व्यक्त केला.
या भेटीप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्यासोबत पंकज खोबे उपस्थित होते.














