जिकतुर उपक्रमांतर्गत मुरूमगावच्या उर्वशीची हवाई सफरीसाठी निवड
– मुख्यमंत्र्यांची भेटही ठरली
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरूमगाव येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. उर्वशी दीपक सांडिल हिची जिल्हा परिषदेच्या ‘जिकतुर’ उपक्रमांतर्गत नागपूर ते मुंबई हवाई सफरीसाठी निवड झाल्याने शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विशेष शैक्षणिक दौऱ्यात उर्वशीला नागपूर–मुंबई विमानप्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून मुंबईतील महत्त्वाच्या व निवडक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची सुवर्णसंधीही तिला लाभणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीला मिळालेल्या या संधीमुळे पालक, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
२३ फेब्रुवारी रोजी शाळेत उर्वशीला शुभेच्छा देत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख अरुण सातपुते, मुख्याध्यापिका गायत्री खेवले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमराज खोब्रागडे तसेच समिती सदस्य, शिक्षकवृंद व केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उर्वशीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.
‘जिकतुर’ उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे अनुभव, व्यापक दृष्टीकोन आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. उर्वशीच्या निवडीमुळे मुरूमगाव शाळेचा नावलौकिक वाढला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरली आहे.














