पेसा व वनहक्क कायदा समजून घेणे काळाची गरज : देवाजी तोफा

56

पेसा व वनहक्क कायदा समजून घेणे काळाची गरज : देवाजी तोफा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : धानोरा तालुक्यातील आदिवासी व पारंपारिक वननिवासी समाजाने पेसा आणि वनहक्क कायदा सखोलपणे समजून घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामसभा लेखा (मेंढा) देवाजी तोफा यांनी केले. ते निमगाव येथे आयोजित ‘पेसा व वनहक्क कायदा महोत्सव २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना देवाजी तोफा म्हणाले की, माणसाने माणसाशी माणुसकीने वागणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण गोंडी भाषेपासून इंग्रजीपर्यंत असावे. पेसा कायदा समजला, मान्य केला आणि प्रभावीपणे अंमलात आणला, तरच त्याचे सकारात्मक परिणाम समाजाला दिसून येतात. आत्मविश्वास वाढवणारा कायदा म्हणजे पेसा आहे.
सध्याच्या शोषणकारी यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचे आणि आदिवासी समाजाचे आर्थिक शोषण होत असल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले की, समाजातील रुढी, प्रथा, परंपरा व संस्कृती जपण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. यासाठी संघटनबद्ध होऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमात राजा, माझी, भूम्या, गाव पुजारी, गाव पाटील, पोलीस पाटील यांच्या भूमिका, तसेच आदिवासी समाजाच्या श्रद्धा, परंपरा व संस्कृतीवर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यासोबतच इयत्ता १ ते ७ व इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी भाषण व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. पेसा कायदा, वनहक्क कायदा, मी संविधान बोलतोय, ग्रामसभा, शिक्षण व आरोग्य व्यवस्था, आदिवासी संस्कृती, पर्यावरण व व्यसनमुक्ती या विषयांवर स्पर्धा पार पडल्या. परिसरातील ३२ शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस २,००० रुपये, द्वितीय १,५०० रुपये व तृतीय १,००० रुपये ठेवण्यात आले होते.
१ ते ७ गटात प्रथम क्रमांक कुमारी खिलेश्वरी कावळे (रांगी), द्वितीय रुची साखरे, तृतीय कुमारी रिया किंरंगे (मासरीगाटा), चतुर्थ संध्या नगराळे (निमगाव), तर पाचवा क्रमांक आराध्य चापळे (निमगाव) हिने पटकाविला.
८ ते १० गटात प्रथम साहिल पदा (निमगाव) तर द्वितीय करिश्मा मिसार (जांगदा बु.) हिने मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र कांटेंगे, तर उपाध्यक्ष म्हणून लालाजी नगराळे उपस्थित होते. उद्घाटन सुखदेव हलामी, सहउद्घाटन रैसुजी गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पेसा व्यवस्थापक प्रमोद भोयर (जिल्हा परिषद, गडचिरोली), दिलीप महाराज काटेंगे, बाळकृष्ण सावसागडे (मुख्याध्यापक), दिवाकर भोयर, विनायक किरंगे, चरणदास जाळे, चंद्रकांत कीचक, निलेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला गावातील व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here