धानोरा येथे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू

1142

– आर्थिक मदतीची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ मार्च : विद्युत करंट लागल्याने बैलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान धानोरा येथील पेट्रोल पंपा नजीक घडली. सदर घटनेने बैल मालकाचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
धानोरा येथे व तालुक्यात आज सकाळपासूनच वीजा व मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. कालांतराने विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यानंतर विद्युत प्रवाह सुरळीत करण्यात आला. मात्र पेट्रोल पंप धानोरा जवळील विद्युत पोलावरून कै .जीवनराव पाटील मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालयाकडे याच ठिकाणाहून विद्युत प्रवाह जोडल्या गेलेला आहे. दरम्यान पेट्रोल पंपा जवळील विद्युत खांबावरील गार्डींग तुटल्याने एका बाजूने विद्युत तारा खाली पडल्या तर दुसऱ्या बाजू वरील काही भाग हा वरील जिवंत तारांना लागल्याने विद्युत प्रवाह खालपर्यंत पोहोचला. या परिसरात दोन बैल फिरत असताना त्याच ठिकाणी जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या बैलमधील लाल रंगाचा बैल रमेश सहारे यांच्या मालकीचा असल्याचे कळले तर दुसऱ्या बैलमालकाचे नाव वृत्त लिहेपर्यंत कडू शकले नाही. यापूर्वीही याच परिसरात तीन-चार जनावराना करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. शहराच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर बाकी ग्रामीण भागात विद्युत विभागाची काय दशा असेल हे यावरून स्पष्ट होते.
संबंधित मालकाला आर्थिक नूकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या बाबतीत अधिक माहिती घेण्याबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधून विचारणा केली असता जनावर मालकाने अर्ज देऊन शवाविच्छेदन प्रमाणपत्र सादर केल्यास आर्थिक मदत महावितरण कंपनीकडून दिल्या जाईल असे सांगितले.

(The gadvishva) (The gdv) (Dhanora) (gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here