दुधमाळा बसस्टॉपजवळ ट्रक पलटला ; चालक किरकोळ जखमी

23

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०७ : धानोरा ते मुरुमगाव दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये हलगर्जीपणा आणि सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या दुर्दशेचा फटका आज पुन्हा एकदा दिसून आला, जेव्हा दुधमाळा गावातील बसस्टॉपजवळ मालवाहू ट्रक पलटून अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.
ही घटना आज ७ जून २०२५ रोजी सकाळी घडली. सुरजागड येथून गडचिरोलीमार्गे छत्तीसगडकडे जाणारा एन.एल. ०१ ए. जे. ६८८० क्रमांकाचा मालवाहू ट्रक, खराब रस्त्यांमुळे दुधमाळा बसस्टॉपजवळ रस्त्याच्या कडेला अडकला. अडकलेला ट्रक बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला पलटला.
या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत संताप व्यक्त केला असून, “रस्त्यावर टाकलेला मुरुम आणि रेती मिश्रित साहित्य पुरेसा दाबलेला नसल्याने मोठ्या वाहनांना फसण्याचा धोका सतत निर्माण होतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here