धानोरा-गडचिरोली महामार्गावर ट्रक रस्त्यात फसला; वाहतूक ठप्प, नागरिक संतप्त

274

– नवीन पुलियेजवळ वाहतुकीची भीषण कोंडी – निकृष्ट रस्ताबांधकामावरून प्रशासनावर टीकेची झोड
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ३० : धानोरा ते गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज सकाळी धानोरा शहराजवळील पेट्रोल पंपाच्या समोरील नव्याने बांधलेल्या पुलियेजवळ एक ट्रक चिखलात फसल्याने संपूर्ण महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या महामार्गावर दररोज शेकडो वाहने धावत असून, दरवेळीच खड्डे, उथळ माती आणि अपूर्ण बांधकाम यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आजचा प्रकार अपघाताच्या उंबरठ्यावर असलेल्या या रस्त्याच्या दयनीय स्थितीचा थरकाप उडवणारा पुरावा ठरतो.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत निवेदने दिली असून, काही ठिकाणी अपघातात बळीही गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे संपूर्ण प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेचा अभाव असल्याने वाहने वळवणे अशक्य बनले आहे. परिणामी फोर व्हीलर गाड्या, अ‍ॅम्ब्युलन्स, स्कूल व्हॅन्स अशा सर्वच वाहनांना जागेवरच थांबावे लागत आहे. या भीषण कोंडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.

#धानोरा #गडचिरोली #राष्ट्रीयमहामार्ग #वाहतूककोंडी #निकृष्टबांधकाम #ट्रकफसला #MahamagMarg #PWDविभाग #धानोराबातमी #गडचिरोलीरोड #अपघातप्रवणरस्ता #जनतेचीअडचण #PublicSafety #InfrastructureFailure #MaharashtraNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here