जपतलाई आश्रमशाळेत आदिवासी जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : धानोरा तालुक्यातील अनु. प्राथ / माध्यमिक आश्रमशाळा जपतलाई येथे वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी जनजाती गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पारंपरिक नृत्य आणि गावातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. रॅलीत विद्यार्थ्यांनी आदिवासी परंपरेचे दर्शन घडवित “जय बिरसा मुंडा”च्या घोषणा देत समाजातील एकता व सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संस्था, गडचिरोली चे सचिव तथा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मा. विश्वजित मारोतराव कोवासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनय मडावी, ग्रा. पं. चुडीयालचे सरपंच विनोद करंगामी, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक व कु. शै. व सो. वि. संस्था, गडचिरोलीचे सदस्य प्रदीप गुंडावार, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, सरगावचे पुजारी चेतन पाटील, तसेच माजी विद्यार्थी व जपतलाईचे उपसरपंच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला, आदिवासी नृत्य व रांगोळी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात विश्वजित कोवासे यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. व्ही. ताटपल्लीवार यांनी केले, संचालन ए. एस. सहारे यांनी केले, तर आभार बी. डी. भोयर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि शिक्षण यांचा संगम साधणारा हा गौरव दिन विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














