The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : शहरांमध्ये राहून उच्च शिक्षण घेणं आणि करिअर घडवणं हे तुलनेनं सुलभ असतं, पण गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातून येऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करणं ही खरोखरच स्तुत्य आणि प्रेरणादायी कामगिरी आहे. भामरागड तालुक्यातील कारमपल्ली, मल्लमपोडूर आणि दुब्बागुडा या अतिदुर्गम आदिवासी गावांतील तिघा विद्यार्थ्यांनी यंदाच्या नीट (NEET) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर आपला ठसा उमटवला आहे.
१४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात देवदास मंगू वाचामी (४७२ गुण), सानिया तुकाराम धुर्वे (३६४ गुण), आणि गुरुदास गिसू मिच्चा (३४८ गुण) या तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळांमध्ये पूर्ण करून, धाराशिव येथील ‘उलगुलान’ संस्थेमार्फत त्यांनी NEET परीक्षेची तयारी केली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडमार्फत त्यांच्या गावी जाऊन करण्यात आला. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी सानियाशी संवाद साधला असता, तिने आपल्या गावातच वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या मते, शहरांमध्ये डॉक्टरांची भरपूर उपलब्धता असली तरी दुर्गम गावांमध्ये अजूनही आरोग्यसेवांचा अभाव आहे, आणि त्यामुळे ती स्वतः आपल्या गावासाठी डॉक्टर बनू इच्छिते. अशीच भावना देवदास आणि गुरुदास यांनीही सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.
या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशच नाही, तर सामाजिक बांधिलकीचाही आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशामागे असलेली पार्श्वभूमी देखील संघर्षमय आहे. देवदास आणि गुरुदास यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, सानियाचे वडील मल्लमपोडूर येथे शेतीमध्ये उत्पन्न नसल्याने सूरजागड लोहखनिज प्रकल्पात ट्रक चालक म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक अडचणी, संसाधनांचा अभाव आणि जंगलातील प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी उभी केलेली ही वाट खरोखरच प्रेरणादायी आहे.
माडिया आदिवासी समाजातील या विद्यार्थ्यांनी दाखवलेला जिद्द, चिकाटी आणि सेवा वृत्तीचा विचार ही येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या या यशामुळे अनेक दुर्गम भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यास सज्ज होतील. हे केवळ वैयक्तिक यश नसून, आदिवासी भागातील शिक्षणाच्या क्षेत्रातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #localnews #letestnews)
