– परिसरात भीतीचे वातावरण, नागरिक दहशतीत
The गडविश्व
सिंदेवाही, दि. १० : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटमधील कारगाटा-ठकाबाई तलाव परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तिघा महिलांचा पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी १० मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून, एकाचवेळी तीन महिलांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेंढा (माल) येथील रेखा शालीक शेन्डे (55), शुभांगी मनोज चौधरी (35) आणि कांता बुधाजी चौधरी (60) या तीन महिला सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. मात्र, त्या दुपारपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. वनविभागाच्या मदतीने सुरू केलेल्या शोध मोहिमेत त्यांच्या मृतदेहांचे अवशेष जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. यातील शुभांगी आणि कांता या सासू-सून असल्याने गावात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी वाघाचे ठसे आढळले असून परिसरात वाघीण व बछड्यांची उपस्थिती असल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे. त्यामुळे डोंगरगाव बिटसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्ताची आणि संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.
दरम्यान वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास व पंचनामा केला. मृतांच्या कुटुंबीयांना वन्यजीव नुकसानभरपाई अंतर्गत मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या गंभीर घटनेमुळे जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांची संख्या वाढत असताना मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वनविभाग व प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरवर्षी तेंदूपत्ता हंगामात असे हल्ले घडूनही ठोस पावले न उचलली जाणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #tigerattack #sindevahi #chandrpurnews #gadchiroli #