रांगी वनपरिक्षेत्रात वाघिणीचा धुमाकूळ : आतापर्यंत 8 जनावरांचा बळी

34

– परिसरात भीतीचे वातावरण, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी
The गडविश्व
धानोरा, दि. १६ : तालुक्यातील रांगी वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या हल्ल्यामुळे आठ जनावरांचा बळी गेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खारडी, खेडी, पिपरटोला, निमणवाडा, धुसानटोला या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघिण पिल्लांसह फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांगी येथील १ बैल, १ जर्सी गाय, खारडी येथील २ शेळ्या व १ गाय, अस्वलपर येथील १ शेळी, निमणवाडा येथील १ गाय, धुसानटोला व पिपरटोला येथील प्रत्येकी १ बैल, तर खेडी येथील १ गोरा अशा एकूण ८ जनावरांचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे.
सदर घटनांनंतर क्षेत्र सहाय्यक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी या भरपाईची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वाघिण आपल्या दोन बछड्यांसह रांगी जंगल परिसरात वास्तव्य करत असल्याचे वनविभागानेही कबूल केले आहे. गावकऱ्यांच्या मते, शेतशिवारात वारंवार वाघिणीचे पावलांचे ठसे दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत रांगी वनपरिक्षेत्राचे राऊंड ऑफिसर ढवळे यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, “वनक्षेत्रात एकटे जाणे टाळावे. आवश्यक असल्यास समूहानेच जावे. मोबाईलवर गाणी लावून किंवा आवाज करून वन्यप्राण्यांना सावध करावे. सभोवताल दक्ष राहावे, झाडाखाली बसू नये, तसेच शक्यतो वनक्षेत्रात जाणे टाळावे,” असे त्यांनी सांगितले.
वनविभागाकडून गावकऱ्यांना जागरूक राहण्याचे आणि जनावरांचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #रांगी #धानोरा #गडचिरोली #वनविभाग #वाघिण #वन्यप्राणीहल्ला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here