धानोरा तालुक्यात थंब मशीन गायब : शेतकरी ऑनलाईन सातबारापासून वंचित, असंतोष वाढला

13

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०४ : शासनाच्या पोर्टलवर आविका मार्फत शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन नोंदणीचे काम वेगाने सुरू असताना तालुक्यातील अनेक केंद्रांवर थंब बायोमेट्रिक मशीन उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सातबारा ऑनलाईन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना परतावे लागण्याची वेळ येत असून शेतकरीवर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आविका मार्फत सुरू असलेल्या सातबारा ऑनलाईन उपक्रमांतर्गत डोळ्यांच्या लेन्सद्वारे प्रमाणीकरणाची प्रक्रिया आहे. मात्र अनेक शेतकरी डोळ्यांच्या गंभीर समस्या, ऑपरेशन, कमी दृष्टी, वृद्धावस्था किंवा खाटेवर असण्यामुळे या प्रक्रियेला सामोरे जाऊ शकत नाहीत. याशिवाय अनेकांच्या आधारची बायोमेट्रिक अपडेट नसल्याने सातबारा ऑनलाईन होणे अडकले आहे. परिणामी हे शेतकरी धान खरेदी प्रक्रियेतून वंचित राहण्याच्या भीतीत आहेत.
तालुक्यात रांगी, मोहली, सोडे, धानोरा, दूधमाळा, चातगाव, पेंढरी, कारवाफा आणि सुरसुंडी-मुरूम या दहा कार्यकारी सोसायटींना धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरची अंतिम मुदत वाढवून ती १५ डिसेंबरपर्यंत नेण्यात आली असली तरी नेटवर्कचे सततचे अडथळे, थंब मशीनचा अभाव आणि गर्दीमुळे शेतकरी तासनतास प्रतीक्षा करत आहेत.
विशेषत: लकवा, दृष्टीदोष, ऑपरेशन केलेले किंवा हालचाल न करू शकणारे शेतकरी पूर्णपणे उपेक्षित ठरत असून “आमचे धान सोसायटी स्वीकारणार का?” असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे. शासनाने नियुक्त केलेल्या BSE कंपनीने प्रत्येक केंद्रावर तातडीने बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे.

दरम्यान, उप प्रादेशिक व्यवस्थापक एच.एस. सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “अशा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून दिली जाणार असून त्यांना मुदतवाढही दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही.”

शेतकऱ्यांचा असंतोष पाहता संबंधित यंत्रणेने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here