कुरखेडा येथे तीन दिवसीय “झाडीपट्टी नाट्य महोत्सव-२०२५” चे आयोजन

338

– नाट्यप्रयोग रसिकांसाठी पूर्णतः मोफत
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २४, २५ व २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कुरखेडा येथे “झाडीपट्टी नाट्य महोत्सव-२०२५” चे आयोजन करण्यात आलेले आहे.
किसान मंगल कार्यालय कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथे सदर महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात यश निकोडे यांच्या लेखणीतून साकार झालेली, ताजुलभाऊ उके, निर्मित व दिग्दर्शित , एकता नाट्य रंगभुमी वडसा द्वारा प्रस्तुत “माणूस एक माती” नाट्यप्रयोग सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सादर होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लेखक बाळकृष्ण ठाकुर यांच्या लेखणीतून साकार झालेली. दिग्दर्शक महेश जाधव, डॉ. प्रविण सहारे यांच्या दिग्दर्शनाने बहरलेली, निर्माता गौतमभाऊ सिंहगडे यांच्या द्वारे निर्मित, कलांकुर थिएटर्स वडसा द्वारे प्रस्तुत केली जाणारी “कलियुग” या नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार आहे. महोत्सवाच्या समारोपीय आयोजनात २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लेखक कै. जगदीश दळवी यांनी आपल्या सदाबहार लेखणीतून घडविलेली, दिग्दर्शक विजय मुळे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनातून महकलेली , श्री व्यंकटेश्वरा नाट्य संपदा, नवरगाव द्वारे प्रस्तुत “लावणी भुलली अभंगाला” या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. सदर नाट्यप्रयोग रसिकांसाठी पूर्णतः मोफत सादर केले जाणार असून, उपरोक्त नाट्य महोत्सवाचा आस्वाद परिसरातील नाट्य रसिकांनी घेण्याचे आवाहन पद्म डॉ. परशुराम खुणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here