मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आदर्श जीवनात उतरण्याची गरज

43

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आदर्श जीवनात उतरण्याची गरज
– ह.भ.प. शंकर कावळे महाराज यांचे प्रतिपादन
The गडविश्व
चोप, दि. १७ : आजची युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने समाजासमोर गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा काळात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे आदर्श आचरणात आणणे ही काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. शंकर कावळे महाराज यांनी येथे केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री दत्त सेवा संस्था व समस्त चोप ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीतमय श्रीरामकथा व ग्रामगीता तत्त्वज्ञान सप्ताह प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिल्यानंतरही अनेक मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, ही समाजाची शोकांतिका आहे. सुसंस्कारांचे सिंचन व्हावे, याच उद्देशाने या ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पित्याचे वचन पाळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून वनवास स्वीकारणारे श्रीराम हे प्रत्येकासाठी आदर्श असून, तो आदर्श केवळ ऐकण्यापुरता न ठेवता आचरणात आणावा, असे आवाहन ह.भ.प. कावळे महाराज यांनी केले.
१४ ते २० डिसेंबर दरम्यान सलग ३५ व्या वर्षी हा सप्ताह साजरा होत असून, दररोज ध्यान-प्रार्थना, रामधून, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा तर २० डिसेंबर रोजी गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाचे दीपप्रज्वलन सरपंच नितीन लाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माराम सूर्यवंशी, दिनकर तितीरमारे, दिनेश कुर्झेकर, गोविंदराव नागपुरकर, केशव लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्झेकर, सचिव त्र्यंबक गिरीधर भजने, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष यशवंत लांजेवार, सचिव सोमेश्वर नाकाडे, सप्ताह समितीचे अध्यक्ष राजू पुस्तोडे, सचिव मुखरुजी कुथे यांच्यासह मदनराव बनपुरकर, चैतन्यश्वर फुलबांधे, केशव ठाकरे, ऋषीजी लांजेवार, लहिराम तितीरमारे, भास्कर तितीरमारे, रामकृष्ण उईके, सुखदेव पात्रिकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here