-दारूबंदीमुळे गावात शांतता
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे सघन गाव भेट दरम्यान मुक्तीपथ-शक्तीपथ स्त्री संघटनेची दुसरी बैठक पार पडली. गावात दारूविक्रीबंदी असल्याने गावात शांतता कायम आहे. दारूविक्री सुरु होऊ नये, यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेण्याचे आवाहन करण्यासोबतच महिलांनी खर्रा-तंबाखूपासून दूर राहण्याचा सल्ला या शक्तिपथच्या दुसर्या बैठकीमध्ये मुक्तिपथ टीमने उपस्थित सर्व महिलांना दिला.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीमध्ये गरोदर, स्तनदा मातांना खर्रा तंबाखूचे दुष्परिणाम सांगून प्रमाण कमी करणे, लहान मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे फायदे सांगण्यात आले. शक्तीवर्धक टॉनिक च्या गोळ्यांचा अनुभव महिलांकडून ऐकण्यात आला. सक्रिय महिलांची यादी तयार करण्यात आली. बैठकीत मुक्तीपथ तालुका संघटक विनोद एल. कोहपरे, उपसंघटक मनिषा प्रधान, लेखाराम हुलके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना कोरेगाव अध्यक्ष महानंदा भोंडे, उपाध्यक्ष माधुरी पुराम, सचिव हेमलता मडावी, तेजस्विनी हेमके व सर्व सदस्य उपस्थित होते.
सघनगाव भेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्तिपथ गाव संघटना व मुक्तीपथ शक्तीपथ स्त्री संघटना पदाधिकाऱ्यांना दारुबंदी टिकवून ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच कोरेगाव जंगलात शोध मोहीम राबवून विक्रेत्यांचा मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यात आला. यावेळी गावातील पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष परसरामजी मलगाम उपस्थित होते.
