लाल किल्ल्याचा अस्त सुरू! अबूझमाडच्या जंगलात शांततेची नवी चाहूल
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी / बस्तर ( स्वाधिनता बाळेकरमकर), दि. १६ : छत्तीसगडच्या बस्तर विभागातील नकाशावर हरवलेला आणि दशकानुदशके नक्षलवादाचा अभेद्य गड मानला गेलेला अबूझमाड परिसर आता बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘लाल विचारधारे’वर उभ्या असलेल्या या रक्तरंजित चळवळीचा पाया आता हादरू लागला असून, नक्षलवादाच्या अस्ताचा नवा अध्याय इथे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
एकेकाळी “शासनाचा पाय ज्या भूमीत पोहोचत नाही” म्हणून ओळखला जाणारा अबूझमाड आता बदलाच्या दिशेने पुढे सरकत आहे. शांततेचा शोध आणि हिंसेच्या समाप्तीकडे झुकणारी मानसिकता या दोन्हींचा संगम या प्रदेशात दिसू लागला आहे.
आत्मसमर्पणाची तयारी १२० नक्षलवादी चर्चेत
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या बस्तर व सीमावर्ती जिल्ह्यांतील सुमारे १२० नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये भैरमगड (जि. बिजापूर) आणि कांकेर भागातील रणनितीकार, शस्त्रधारी कमांडर, तसेच दंडकारण्य विशेष विभागीय समिती (DKZC) शी संबंधित सदस्यांचा समावेश आहे.
या गटात दक्षिण बस्तरातील हिडमा आणि देवा यांसारख्या नामवंत कमांडरांच्या हालचालींवर सखोल माहिती ठेवणारा रुपेश या सदस्याचं नाव विशेष चर्चेत आहे.
२०२४ पासून आतापर्यंत – नक्षल चळवळीला जबर धक्का
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२४ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत २,१०० नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या प्रक्रियेत आले, १,७८५ जणांना अटक करण्यात आली, तर ४७७ नक्षलवादी चकमकींमध्ये ठार झाले आहेत.
या आकड्यांमागे आहे संघटनेतील अंतर्गत असंतोष, कमी होणारा जनाधार आणि नेतृत्वावरील तुटलेला विश्वास.
अबूझमाडचा बदलता चेहरा
जिथे पूर्वी शासनाची उपस्थिती नव्हती, त्या भागात आज लोकशाहीच्या मूल्यांची चर्चा सुरू झाली आहे. सततच्या पोलिस व सुरक्षा मोहिमा, पुरवठा मार्ग खंडित होणं, आणि स्थानिक समाजात वाढणारा हिंसेविरोधी कल यामुळे नक्षल संघटनेचा पाया कोसळू लागला आहे.
काही गावांनी उघडपणे नक्षलवादाला विरोध करण्याचं धाडस दाखवलं आहे, हे या बदलाचं सर्वात मोठं चिन्ह मानलं जात आहे.
अजून ‘नक्षलमुक्त’ नाही, पण दिशादर्शन स्पष्ट
अबूझमाड अद्याप अधिकृतरीत्या ‘नक्षलमुक्त’ घोषित झालेला नाही. परंतु घटनांचा वेग आणि आतून हलणाऱ्या हालचाली पाहता, पुढील काही महिन्यांत निर्णायक टप्पा येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Abujhmad #Bastar #Chhattisgarh #NaxalSurrender #LeftWingExtremism #PeaceProcess #NaxalismDecline #SecurityForces #IndiaNews #Transformation #RedCorridor #AbujhmadChange #BastarUpdate #NaxalFreeIndia #DevelopmentInAbujhmad

