कुरखेडा शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

47

कुरखेडा शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
– नगर पंचायतकडून ठोस उपाययोजनांचा अभाव
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १९ : कुरखेडा शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आजारग्रस्त, जखमी तसेच आक्रमक स्वभावाची मोकाट कुत्री शहरातील रस्ते, गल्ल्या, बाजारपेठ, बसस्थानक व शाळा परिसरात मुक्तपणे फिरताना दिसत असून लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा परिसर, पोलीस स्टेशन लगतची वस्ती तसेच रहिवासी भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके दिवसभर फिरत असते. गेल्या काही महिन्यांत मोकाट कुत्र्यांनी शेळ्यांना चावा घेण्याच्या तसेच शहरालगत वावरणाऱ्या जंगली चितळांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच कुरखेडा पोलीस स्टेशन लगतच्या परिसरात मोकाट कुत्र्यांनी शेळ्यांना चावा घेतल्याची घटना घडली असून, त्याची नोंद स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक पालकांनी मुलांना एकटे शाळेत पाठवणे टाळल्याचे सांगितले आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोकाट कुत्र्यांच्या भीतीमुळे घराबाहेर पडणे अवघड होत आहे.
मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले जन्मनियंत्रण कार्यक्रम (Animal Birth Control – ABC), लसीकरण मोहीम तसेच कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलविणे या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून समस्या अधिक गंभीर होत चालली आहे.

न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी अपेक्षित

प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६० आणि आवारा कुत्र्यांसाठी जन्मनियंत्रण नियम, २००१ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी वैज्ञानिक पद्धतीने मोकाट कुत्र्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना, कुरखेडा नगर पंचायतकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पर्यावरण व प्राणीहक्क कार्यकर्त्यांच्या मते, शहरातील कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि खुले अन्न उपलब्धतेमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
दरम्यान कुरखेडा नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी महेश पिपरे यांनी सांगितले की, मोकाट कुत्र्यांच्या समस्येची दखल घेण्यात आली आहे. भटक्या श्वानांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून श्वान पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या बाबतीत प्रक्रिया सुरू आहे. लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
मात्र, यापूर्वीही अशाच प्रकारची आश्वासने देण्यात आल्याने नागरिकांकडून तातडीने ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न लवकर मार्गी न लावल्यास भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने शास्त्रोक्त पद्धतीने जन्मनियंत्रण, लसीकरण व व्यवस्थापनाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here