हैद्राबाद शैक्षणिक सहल ठरली ज्ञानवर्धक ; विद्यार्थ्यांनी चारमिनार–गोवलकोंडा किल्ल्याचा घेतला इतिहासाचा धडा

34

हैद्राबाद शैक्षणिक सहल ठरली ज्ञानवर्धक ; विद्यार्थ्यांनी चारमिनार–गोवलकोंडा किल्ल्याचा घेतला इतिहासाचा धडा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : जिल्हा परिषद हायस्कुल, धानोरा येथील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच हैद्राबाद येथे आयोजित केलेली शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पूर्ण केली. या सहलीत विद्यार्थ्यांनी हैद्राबादच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व आधुनिक पर्यटनस्थळांना भेट देत प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवली.
या सहलीत एकूण ३० विद्यार्थी व ६ शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथील ऐतिहासिक चारमिनार, गोवलकोंडा किल्ला, लुंबिनी पार्क, बुद्धा स्टॅच्यू, सालारजंग संग्रहालय तसेच बिरला मंदिर या प्रसिद्ध स्थळांना भेट दिली. विशेषतः चारमिनार व गोवलकोंडा किल्ल्याचा इतिहास, किल्ल्याची भव्य वास्तुरचना आणि ध्वनीप्रतिध्वनी प्रणाली विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली.
सहलदरम्यान विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीला भेट देत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामोजी फिल्म सिटीमध्ये विविध फिल्म सेट्स, भव्य राजवाडे, शहरांचे प्रतिकात्मक नमुने, उद्याने तसेच लाईव्ह स्टंट व अ‍ॅक्शन शो पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारी कॅमेरा यंत्रणा, लाईटिंग व सेट डिझाइन यांची माहिती तसेच प्रत्यक्ष कलाकारांसोबत सहभाग घेण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व मनोरंजक ठरला.
सालारजंग संग्रहालयातील दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. वर्गात शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन माहिती समजून घेणे अधिक प्रभावी ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सहलप्रमुख पी. व्ही. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. रत्नागिरी, कु. रजनी मडावी, डॉ. रश्मी डोके, हरीश पठाण व देवेन्द्र भालेराव या शिक्षकांच्या उपस्थितीत सहल सुरक्षित व शिस्तबद्धरीत्या पार पडली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, निरीक्षणशक्ती व आत्मविश्वास वाढल्याचे सहलप्रमुखांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी आनंददायी अनुभव शेअर करत मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसे, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here