– बैलबंडी वरात आणि फुले-तुकडोजींच्या विचारांचा जागर
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील लेखा गावाने सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला, कारण येथे प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. परंपरेला छेद देत आणि समाजप्रबोधनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल चर्चेचा विषय ठरले आहे.
लेखा येथील निरंजन मोहुर्ले यांची जेष्ठ कन्या तेजल हिचा विवाह धानोरा येथील विश्वनाथ सोनुले यांचे चिरंजीव गुरुदेव सोनुले यांच्याशी पारंपरिक सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. विवाहाआधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
विशेष आकर्षण ठरली ती बैलबंडीमधून निघालेली वऱ्हाड आणि विवाह मंडपात सुरू असलेला “गाणी सावित्री-जोतिबांची” या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेले प्रभावी प्रबोधन. सत्यशोधक विधीकर्ते सुनील कावळे यांनी विवाह विधीचे अर्थपूर्ण महत्त्व समजावून सांगितले. वधू-वरांनी एकमेकांना हार घालून, महात्मा फुले रचित मंगलाष्टकांचे पठण केले आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत शपथ घेऊन विवाह पूर्णत्वास नेला. त्यानंतर सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र नवदाम्पत्याला देण्यात आले.
कार्यक्रमात पुरुषोत्तम निकोडे, विनोद लेनगुरे, सदाशिव सहारे, वामन लोंहबरे, जयश्री सहारे, प्रशांत निकेसर, विजय गुरनुले, अमोल मांदाळे आदी समाजसेवकांचा नवदाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या आयोजनात गोविंदा चौधरी, मुखरु मांदाळे, देवानंद भेडारे, विनायक मोहुले, नरेश मोहुले, पवन मोहुले, प्रदीप जेगठे आणि मिनाक्षी गुरनुले यांचे मोलाचे योगदान लाभले.
लेखा गावातील हा सत्यशोधक विवाह तालुक्यातील सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल ठरत असून, या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #सत्यशोधकविवाह #लेखागाव #SocialReform #EqualityInMarriage #JotibaPhule #SavitriPhule #RationalWedding #GadchiroliInspiration #MaharashtraDay2025 #धानोरा_ते_प्रेरणा