– हेडरी गावात ब्लॅक फॉरेस्ट बेकरीचे उत्साहात उद्घाटन
The गडविश्व
अहेरी, दि. १३ : गडचिरोलीच्या विकासकथेत सोमवारी एक नवा गोड अध्याय जोडला गेला. दुर्गम हेडरी गावात पहिल्यांदाच उच्च दर्जाची ब्लॅक फॉरेस्ट बेकरी सुरू झाली असून, स्थानिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.
या बेकरीचे उद्घाटन पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, नागुलवाडीचे सरपंच नेवलू गावडे, तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे उपसरपंच राजू तिम्मा, पुरसलगोंदीचे माजी सरपंच कात्या तेलामी, माजी सरपंच कल्पना आलाम, ग्रामपंचायत सदस्य छाया जेट्टी आणि लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) तसेच लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन चे संचालक बी. प्रभाकरन यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनावेळी ग्रामस्थांनी बेकरी उत्पादनांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. सरपंचांनी याला “जिल्ह्यातील सकारात्मक बदलाचे प्रतीक” असे संबोधले. यावेळी प्रभाकरन म्हणाले, “बेकरी ही केवळ एक इमारत नसून दुर्गम भागातील विकासाचा आरसा आहे. गडचिरोली आता देशातील सर्वात उल्लेखनीय परिवर्तनकथांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिकांची जीवनशैली अधिक समृद्ध होईल.”
याआधी २७ जून रोजी कोनसरी येथे जिल्ह्यातील पहिली ब्लॅक फॉरेस्ट बेकरी आणि फूड प्लाझा सुरू झाला होता. कोनसरी येथे एलएमईएलचे डीआरआय व पेलेट प्रकल्प कार्यरत असून ४.५ एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प प्रस्तावित आहे.
पूजा व उद्घाटनानंतर प्रभाकरन यांनी बेकरीला भेट देऊन एलएमईएल अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #aheri #hedari
