अनुसूचित जाती–जमातींचे प्रश्न सोडविण्यास आयोग कटिबद्ध
– ॲड. धर्मपाल मेश्राम यांची ग्वाही
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : अनुसूचित जाती व जमाती समाजाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती–जमाती आयोग ठामपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली. त्यांनी आज गडचिरोली नगरपरिषदेला भेट देऊन नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर, नगरसेवक, पदाधिकारी तसेच मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांच्याशी सविस्तर संवाद साधत नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी ॲड. मेश्राम यांनी शासनाकडे पाठपुरावा आवश्यक असलेल्या विषयांची माहिती घेत अनुसूचित जाती–जमातीशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले. लाड पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या मंजूर ११ पदांपैकी ९ पदे अधिकार नसताना व्यपगत केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी संबंधितांकडून तातडीने स्पष्टीकरण मागविण्याचे निर्देश दिले. तसेच मागील एक वर्षातील विकासकामांचे प्रस्ताव, शासनाकडे सादर करण्यात आलेले प्रस्ताव, तसेच नगरपरिषदेचे लेखा परीक्षण कधी झाले व त्यामध्ये कोणते शेरे नोंदविण्यात आले याबाबत सविस्तर चौकशी केली. आर्थिक शिस्त व पारदर्शकता राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने व समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर ॲड. मेश्राम यांनी धानोरा तालुक्यातील सिताटोला या आदिवासी गावाला भेट देऊन पारंपरिक कुर्मा घर तसेच त्याला पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या ‘मावा आस्काना लोण’ (आपल्या हक्काचे घर) या संकल्पनेतील घराची पाहणी केली. मासिक पाळीच्या काळात महिलांना कुर्मा घरात ठेवण्याची प्रथा असून, ही घरे अनेक ठिकाणी अस्वच्छ व असुरक्षित असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर स्पर्श समाजसेवी संस्थेने महिलांच्या आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा विचार करून ‘मावा आस्काना लोण’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे. स्थानिक महिलांनी श्रमदानातून उभारलेल्या या घरांचे ॲड. मेश्राम यांनी कौतुक केले. अशा सकारात्मक उपक्रमांना शासनस्तरावर पाठबळ देण्याची आवश्यकता असून, यासंदर्भात उद्या आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर आढावा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.














