गडचिरोलीत अभाविप विदर्भ प्रांताचे ५४वे ऐतिहासिक अधिवेशन ; ५०० विद्यार्थी प्रतिनिधींचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विदर्भ प्रांताचे ५४वे प्रांत अधिवेशन येत्या ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी गडचिरोली येथील ‘सुमानंद’ सभागृह, नागपूर रोड येथे उत्साहात पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या शुभहस्ते होणार असून, हे अधिवेशन विदर्भातील युवा तरुणाईला नवी ऊर्जा व दिशा देणारे ठरेल, अशी माहिती विदर्भ प्रांत मंत्री सुश्री पायल किनाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनासाठी विदर्भातील १२० तालुके व ११९ प्रमुख केंद्रांमधून एकूण २३९ ठिकाणांवरून, ३५० महाविद्यालयांचे सुमारे ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अधिवेशनादरम्यान विविध शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन, त्या समस्यांच्या निराकरणासाठी महत्त्वाचे प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत.
गडचिरोलीच्या पावन भूमीवर प्रथमच विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत असल्याने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. याच वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंतीचे १५०वे वर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर, झारखंडमधील उलिहातू येथून आणलेल्या मातीच्या कलशासह अभाविपतर्फे तीन जनजाती गौरव यात्रा काढण्यात येणार आहेत. या यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, अमरावती जिल्ह्यातील धारणी व गोंदिया जिल्ह्यातील कचरगड येथून निघून ८ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत गडचिरोलीतील ‘भगवान बिरसा मुंडा नगर’ येथे दाखल होतील. अधिवेशनाच्या स्थळाला ‘भगवान बिरसा मुंडा नगर’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
अधिवेशन काळात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांच्या माध्यमातून वैदर्भीय संस्कृतीचे बहुरंगी दर्शन घडेल. या शोभायात्रेचा समारोप जाहीर सभेने होणार असून, या सभेत विदर्भ प्रांतातील विद्यार्थी नेते विविध समकालीन विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. मिलिंद नरोटे काम पाहणार असून, उपाध्यक्ष म्हणून ॲड. प्राणोती निंबोरकर व प्रंचीत पोरेड्डीवार, सचिव म्हणून गोविंद सारडा, सहसचिव म्हणून प्रमोद पिंपरे व अनिल पोहणकर, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रशांत भृगवार यांची निवड करण्यात आली आहे. स्वागत समितीचे संरक्षक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गडचिरोली जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, माजी खासदार डॉ. अशोक नेते, ॲड. प्रमोद बोरावार, आमदार धर्मराव आत्राम, कीर्तिकुमार भांगडिया, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेव हुसेंडी यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
“युवा म्हणजे भावी नेतृत्व. हे नेतृत्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गडचिरोलीत येणार असून, ही गडचिरोलीकरांसाठी मोठी संधी आहे. या संधीचे सोने करून अधिवेशनाला येणाऱ्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे मनापासून स्वागत करावे व अधिवेशनास भरभरून सहकार्य द्यावे,” असे आवाहन स्वागत समितीचे सचिव गोविंद सारडा यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अभाविप गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा. सौ. सुनीता साळवे, नगर मंत्री संकेत मस्के, तसेच जिल्हा मीडिया संयोजक करण चौधरी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














