The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : तालुक्यातील मौशी-कुरखेडा मार्गावर रिलायन्स कंपनीच्या टॉवरजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात अक्षय निरंगसू पोरेटी (वय 26) रा. सलंगटोला याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पत्नी सारथी पोरेटी (21) आणि गौरव नैताम (15) हे तिघे त्यांच्या दुचाकी क्रमांक MH 40 Q 7465 वरून कुरखेडाहून सलंगटोला जात होते. त्याच वेळी, मौशी गावातील जिया नैताम (32), विवेक कोडाप (21) आणि विलास मडावी (30) रा. वडेगाव बंध्या हे तिघे MH 31 KR 755 क्रमांकाच्या दुचाकीने कुरखेडाच्या दिशेने येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा समोरचा भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. या अपघातात अक्षय पोरेटीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू आहे.
विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत तालुक्यातील कढोली-कुरखेडा मार्गावरही दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले होते. या सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
