नळ पाणीपुरवठा उद्ध्वस्त ; साखेरा ग्रामस्थांचा रस्ता बांधकाम रोको आंदोलन

50

नळ पाणीपुरवठा उद्ध्वस्त ; साखेरा ग्रामस्थांचा रस्ता बांधकाम रोको आंदोलन
– साखेरा येथे संतापाचा उद्रेक – MSRDC व कंत्राटदाराच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : धानोरा तालुक्यातील साखेरा येथे शुक्रवार १८ डिसेंबर २०२५ रोजी नळ पाणीपुरवठा योजनेच्या वितरण नलिकांची तोडफोड झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी काँक्रीट रस्ता बांधकाम रोको आंदोलन छेडले. ग्रामपंचायत साखेरा अंतर्गत येणाऱ्या नळ पाणीपुरवठा वितरण नलिका पूर्ववत करून देण्यात याव्यात, या ठाम मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट बांधकाम बंद पाडले.
साखेरा येथे MSRDC मार्फत मे. गुरुबक्षानी, गडचिरोली यांच्या द्वारे सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान नळ पाणीपुरवठा योजनेच्या वितरण नलिकांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. मात्र, ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित प्राधिकरण व कंत्राटदाराकडून कोणतीही दुरुस्ती अथवा पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली.
पाणी नाही तर रस्ता नाही, अशी ठाम भूमिका घेत अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी रस्त्याचे काम थांबवून वितरण नलिका तात्काळ पूर्ववत करून देण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी सरपंच अनिलराव दळांजे, उपसरपंच तानुजी पोटावी, ग्रामपंचायत सदस्य माधुरी उसेंडी, संगिता कटकेवार, ग्रामसभा अध्यक्ष लक्ष्मण वडे, तंटामुक्त समिती सदस्य भागरताबाई कुमोटी, सुंदराबाई गावळे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, कंत्राटदार मे. गुरुबक्षानीचे एमडी निंबोरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर तूर्तास बांधकाम रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, नळ पाणीपुरवठा वितरण नलिका तात्काळ दुरुस्त न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here