The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.०७ : धानोरा तहसील कार्यालय सभागृहात मंगळवारी, ६ मे २०२५ रोजी तालुकास्तरीय खरिप हंगाम शेतकरी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान नायब तहसीलदार नरेंद्र वाळके यांनी भूषवले.
कार्यशाळेत खरीप हंगामपूर्व तयारीसंदर्भात शेतकऱ्यांना विविध उपयुक्त माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. नैसर्गिक शेतीचे महत्व, निविष्ठांची निर्मिती व योग्य वापर, १०% कमी खतांचा वापर, भात व तूर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर यांनी दिली.
प्रविण मोहुर्ले (कृषि पर्यवेक्षक, धानोरा) यांनी मृद नमुना काढण्याची प्रक्रिया, बिजप्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी तसेच खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची दक्षता याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. भाकरे (कृषि पर्यवेक्षक, धानोरा) यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहिती दिली. अविनाश किरंगे (कृषि सहाय्यक, पेंढरी) यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) व भा.फु.फ.ला योजनांविषयी माहिती दिली.
कार्यशाळेची प्रस्तावना मंडळ कृषि अधिकारी पी. एस. मडावी यांनी केली. सूत्रसंचालन हिमालय रावते तर आभार प्रदर्शन संतोष चलाख (कृषि पर्यवेक्षक, धानोरा) यांनी केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधव, महिला बचत गट प्रतिनिधी, FPO सदस्य आणि कृषि विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली.
